Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Friday, January 18, 2019

Chintu, Pintu In The Village

गोष्टीचे नाव जरी इंग्रजी मध्ये असले तरी गोष्टं मराठीत आहे.




एक मुलगा मुलगी होते. त्यांची नावं चिंटू आणि पिंटू. मुलगा चिंटू, आणि मुलगी पिंटू. ते एका छोट्या गावात राहत होते. त्या गावाचा एक 'bravest' भूभू होता.

चिंटू आणि पिंटू दररोज लवकर उठायचे आणि ब्रश करून शाळेत जायचे. एक दिवस त्यांच्या 'ट्रॅव्हलर' च्या ऑंटी फोने आला की गाडी खराब आहे म्हणून मेन रोड वर या.

मग ते गेले सर्व बाहेर. तर बघतो काय! गाडी बंद पडली होती. चिंटू-पिंटूची आई मेकॅनिक होती. मग तिने गाडीच्या खाली जाऊन गाडी दुरुस्त केली. गाडीच्या पुढचे मशीन पण ठीक केलं.

सगळेजण त्यांच्या आईला थँक यू म्हणाले. मग सगळे शाळेत गेले.

अशी झाली छोट्या गावातली गोष्टं! 

Thursday, January 3, 2019

मुलगा आणि झाडे

एक मुलगा होता
झाडांवर बसला होता

तो गेला फिरायला त्याने बघितले
खूप झाडे-झाडे होती

त्याने सगळी झाडे
खाऊन टाकली

Sunday, July 30, 2017

झोप

झोप येते कोठून
झोप जाते कोठून

आली की काय करते?
खाते काय, पिते काय?

झोपेला झोप आली तर
माणसाला झोप येईल काय?

(Composed by my father for my daughter)

Sunday, July 14, 2013

ऋतुराजाची चाहूल

 - पद्मा गोळे

आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलीना लागली.

देवचाफा हा पहा ना
अंगोपांगी बहरला,
मोगराही कोवळ्याशा
पाने सजाया लागला. 

डोळे खिळविती माझे
जास्वंदीची लाल फुले,
बहाव्याने येथे तेथे
सोनतोरण बांधिले.

'कुहू' गाऊन  कोकिळा
करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत. 

Sunday, June 23, 2013

वासरू

- आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल) (१९०१ - १९८२)


ओढाळ वासरू रानी आले फिरू
कळपाचा घेरू सोडुनिया

कानांमध्ये वारे भरुनिया न्यारे
फेर धरी फिरे रानोमाळ

मोकाट मोकाट, अफाट अफाट
वाटेल ती वात धावू लागे

विसरुनी भान भूक नि तहान
पायांखाली रान घाली सारे

थकुनिया खूप सरता हुरूप
आठवे कळप तयालागी

फिरू जाता मागे दूर जाऊ लागे
आणखीच भागे भटकत

पडता अंधारू लागले हंबरू
माय! तू लेकरू शोधू येई. 

Sunday, June 16, 2013

अन्योक्ती

- कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४ - १८७८)


मयूरान्योक्ती

झाडे पेटुनी वाजती कडकडा, त्यांचा ध्वनी होतसे,
ज्वाला राहुनि राहुनी उठती या, विद्युल्लता ही नसे,
काळा धूर नभी बहु पसरला, हा मेघ नोहे खरा,
वर्षाकाळ न हा, दवानल असे, मोरा, पळे रे घर घरा.




शुकान्योक्ती 

फळे मधुर खावया असति, नित्य मेवे तसे,
हिरेजडीत सुंदरी कनकपंजरीही वसे,
अहर्निश तथापि तो शुक मनात दु:खें झुरे,
स्वतंत्र वनवृत्तिच्या घडिघडी सुखाते स्मरे.







बाकान्योक्ती 

उभा राहे एके चरणी धरणीते धरुनिया,
तपस्चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनिया.
बका, ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझे कपट लवलाही उमजती. 

Thursday, July 19, 2012

जिथे राबती हात

नसे राउळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी

जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम
तिथे अन्न होऊन ठाकेल शाम
दिसे सावळे रूप त्याचे शिवारी!
नको मंत्र त्याला मुनीब्राह्मणाचे
तया आवडे गीत श्वासा-घणाचे
वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी!
शिळा फोडती संघ पाथरवटांचे
कुणी कापसा रूप देती पटांचे
तयांच्या घरी नांदतो तो मुरारी!
जिथे काम तेथे उभा श्याम आहे
नव्हे धर्म रे घर्म ते रूप आहे
असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी!

-ग. दि. माडगूळकर 

Tuesday, February 21, 2012

झुक झुक झुक गाडी

गाडी आली, गाडी आली झुक झुक झुक
शिट्टी कशी वाजे पहा कुक कुक कुक
इंजिनाचा धूर निघे भक भक भक
चाके पाहू तपासुनी ठक ठक ठक
गाडीमध्ये चढा सारे चट चट चट
गाडीमध्ये बस चला पट पट पट
तिकिटाचे पैसे काढा छन छन छन
गाडीची ही घंटा वाजे घण घण घण
नका बघू डोकावून शुक शुक शुक
गाडी आता निघालीच झुक झुक झुक 

Saturday, September 24, 2011

चिऊ चिऊ चिमणी

चिव चिव चिमणी छतांSत छतांSत.
अरसा लोंबे भिंतीला भिंतीला.
चिमणी पाहे सवतीला सवतीला.
भरभर आली रागांत रागांत.
पहिली:- "चिउताइ चिउताइ, काय् बघता? काय् बघता?"
दुसरी:- "टच् टच् चिउताइ, काय् करितां? काय् करितां?"
तिसरी:- "ती तर तुमची पडछाया पडछाया--"
चवथी:- "उगीच शिणता का वाया का वाया?"
पहिली:- "फुटेल काच्."
दुसरी:- "दुखेल चोच्."
तिसरी:- "पडेल खोSच चोचीला चोचीला."
चवथी:- "काSय होईल सवतीला सवतीला?"
सर्वजणी:- "टाळ्या वाजवुं या चट्चट् या चट्चट्.
पावलें फिरवूं या पट्पट् या पट्पट्.
भुर्र चिमणी उडाली उडाली.
छतांत जाउनि दडाSली दडाSली."


भा. रा. तांबे
देवास, १८९३.

आजीचं घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि ते कुठें अजुनि हें नाहीं कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुकें वाटते;
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखें चालते! १

'अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,'
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी.
साडेपाचही वाजतात न कुठें तो हाक ये नेमकी,
'बाळा झांजर जहाले, अरवला तो कोंबडा, ऊठ की!' २ 

ताईची करण्यास जम्मत, तसें बाबूसवे भांडता
जाई संपुनिया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता!
'आली ओटीवरी उन्हें बघ!' म्हणे आजी, 'दहा वाजले!
जा जा लौकर!' कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे. ३ 

खेळाच्या अगदी भरात गढूनी जाता आम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे! आजी परी आतुनी
बोले, 'खेळ पुरे, घरांत परता! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येऊन!' ४ 

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा,
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता!
'अर्धी रात्र कि रे' म्हणे उलटली, 'गोष्टी पुरे! जा पडा!'
लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजवाया चौघडा. ५ 

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पूस ऊनहि कळतसे सारे तिला त्यातुनी!
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधूनी तिचे आलो! तरी न मिले! ६

-केशवकुमार (आचार्य अत्रे) 

Monday, August 8, 2011

काटा रुते कुणाला

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुल ही रुतावे हा दैवयोग आहे

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जीवाची
चीरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे

काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणे ही विपरीत होत आहे

हा स्नेहवंचना की काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे 

गीत: शांता शेळके
गायक, संगीतकार: पंडित. जितेंद्र अभिषेकी
नाटक: हे बंध रेशमाचे (१९७२)

Tuesday, August 2, 2011

श्रावणमासी हर्ष मानसी

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे

झालासे सूर्यास्त वाटतो सांज-अहाहा! तो उघडे
तरू शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची मालाची ते
उतरुनी येती अवनी वरती ग्राहगोलची की एकमते

फाडफाड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गाय तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

Thursday, July 21, 2011

आभाळ वाजलं धडाड धूम

आभाळ वाजलं धडाड धूम
वारा सुटला सू सू सू

वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख

पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिला सो सो सो

पाण्यात बोट सोडली, सोडली
हातभार जाऊन बुडली, बुडली

बोटीवर बसला बेडूक, बेडूक
तो ओरडला डराव-डुक, डराव-डुक

Wednesday, July 13, 2011

राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा

राजहंस सांगतो कितीर्च्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता


पाहिले तुला न मी, तरी ही नित्य पाहते
लाजूनी मनोमनी, उगीच धूंद राहते
ठावूक न मजसी जरी निषध देश कोणता


दिवस रात्र ओढणी, या मनास लागते
तुझीच जाहल्या परी, मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते, तुझी अमोल योग्यता


निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नाद चित्र रेखितो, तुझेच मंद कुजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागूता


गीतकार: ग. दि. माडगुळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक: आशा भोसले
चित्रपट: सुवासिनी (१९६१)

Monday, July 11, 2011

धीवर पक्षी

तळ्याकाठी गाती लाटा
लाटामधे उभी झाड
झाडावर धीवरची
दिसे चोच लाल जाड


शुभ्र छाती पिंगे पोट
जसा चाफा यावा फुली
पंख जणू थंडी मधे
बन्डि घाले आमसुली


गड्या पाखरा तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना
नको मारू मात्रा मासा


[ही कविता कोणाची आहे ते आता आठवत नाही. ही कविता आम्ही बालभारती च्या कॅसेट वर ऐकली. कॅसेट वरची कविता आणि अगदी त्याची चाल पण व्यवस्थित आठवते. कोणाला ह्या कवितेबद्दल काही माहिती असल्यास जरूर द्यावी. -PP]

Tuesday, July 5, 2011

सरयू तीरावरी अयोध्या

सरयू-तीरावरी
अयोध्या मनुनिर्मित नागरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधून वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती, नटुनी त्यांच्यावरी १
घराघरावर रत्नतोरणे
अवती भवती रम्य उपवने
त्यात रंगती नृत्य गायने
मृदंग वीणा नित्य नादती, अलका नगरीपरी २
स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक,
पुत्र उपजाती निजकुल-दीपक
नृशंस ना कुणी, कुणी ना नास्तिक,
अतृप्तीचा कुठे ना वावर, नगरी, घरी, अंतरी ३
इक्ष्वाकू-कुल कीर्ती भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचे करितो रक्षण
गृही चंद्रसा, नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी ४
दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्य
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी ५
तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगामी
 तिन्ही लोकीचे सुख ये धामी
एक उणे पण गृहस्थाश्रमी
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतीच्या अंबरी ६
शल्य एक ते कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती, छळिते अभ्यंतरी ७
राज्सौख्य ते   सौख्य जनांचे
एकाच चिंतन लक्ष मनांचे
काय काज या सौख्य-धनाचे?
कल्पतरूला फूल नसे का? वसंत सरला तरी? ८
गीतकार: ग. दि. माडगुळकर
संगीतकार, गायक: सुधीर फडके 

Sunday, June 19, 2011

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा
पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा

भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जूळवितसे सहज दुवा
 
गीतकार: शांता शेळके
संगीतकार: श्रीधर फडके
गायक: आशा भोसले  

Wednesday, April 6, 2011

त्या फुलांच्या गंधकोषी

त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ?
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ?
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ?

मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ?

जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ?
कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ?
मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?


गीतकार: सूर्यकांत खांडेकर
संगीतकार: पंडित हृदयनाथ मंगेशकर 

Wednesday, February 23, 2011

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

गीत रामायणातील अतिशय सुंदर काव्य

दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

माय कैकेयी ना दोषी, नव्हे दोषी तात
राज्यत्याग, काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा - 1

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होते, नेम हा जगाचा - 2

जिवासवे जन्मे मृत्यु, जोड जन्मजात    
दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा? - 3

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनात
अतर्क्य ना झाले काही, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा - 4

जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात?
दू:खमुक्त जगाला का रे कोणी जीवनात?
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा - 5

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा - 6

नको आसू ढाळू आता, पूस लोचानास
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा - 7

नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करी, का वेष तापसाचा? - 8

संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चार
अयोध्येस नाही येणे, सत्य हे त्रिवार
तूच एक स्वामी आता राज्यसंपदेचा - 9

पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनात
मान वाढावी तू लोकी अयोध्यापुरीचा - १०

गीत: ग. दि. माडगुळकर
संगीत: सुधीर फडके 
 

A Homeless Night